पवारांच्या सभेतील `साळुंखे मंडप डेकोरेटर्स` सोशल मीडियावर व्हायरल
पवारांच्या अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी भर पावसात साताऱ्याच्या सभेत केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी पाऊस पडला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या. मात्र, शरद पवारांनी धो-धो पाऊस पडत असतानाही व्यासपीठावर उभे राहून भाषण ठोकले. पवारांच्या अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. यावेळी शरद पवार यांच्याबरोबर आणखी एका गोष्टीची चर्चा रंगली होती. ती म्हणजे साळुंखे मंडप डेकोरेटर्स.
या सभेचे व्यासपीठ साळुंखे मंडप डेकोरेटर्सकडून तयार करण्यात आले होते. यावेळी मुख्य वक्ते भाषण करणार असलेल्या पोडियमवर 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स सातारा' असे लिहले होते. भर पावसातील पवारांचे भाषण पाहताना ही गोष्ट अनेकांच्या नजरेत भरली. त्यामुळे सोशल मीडियावर 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स'वरून मजेशीर चर्चा रंगल्या होत्या. अनेकांनी पवारांच्या सभेनंतर इंटरनेटवर 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स' असे सर्चही करून पाहिले. त्यामुळे हे 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स' नेमके आहेत तरी कोण, याविषयी उत्सुकता निर्माण झाली.
'एक दिवस मोदी रोहित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामं पाहायला येतील'
मात्र, कालच्या भाषणानंत सोशल मीडियावर सबकुछ शरद पवार असेच चित्र निर्माण झाले होते. अनेकांनी शरद पवार यांनी वयाच्या ८० व्या वर्षी दाखवलेल्या उर्जेचे कौतुक केले. एकूणच अन्य राजकीय पक्षांना मोठमोठाले इव्हेंट आणि सभा घेऊन जे साधले नाही ते पवारांनी अवघ्या काही क्षणांमध्ये करून दाखवले.