सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी कुटुंबाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. गांधी घराण्यात दोन हत्या झाल्यानंतरही सोनिया गांधींनी देशासाठी काँग्रेसचं नेतृत्व केलं. त्यामुळे गांधी घराण्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा असं देखील पवारांनी म्हटलं आहे. साताऱ्या जिल्ह्यातील पाटणमध्ये भाषण करत असताना पवारांनी हे वक्तव्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी देखील शरद पवार यांनी गांधी कुटुंबीयांची पाठराखण केली होती. गांधी कुटुंबीयांनी देशासाठी बलिदान दिलं. या कुटुंबाचे देशासाठीचे योगदान लक्षात न घेता राहुल गांधी यांच्या भीतीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयला हाताशी धरून राजीव गांधी यांच्यावरील खटला न्यायालयात मुद्दाम दाखल केला असं देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी म्हटलं होतं.


काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. पण आता त्यांनी सोनिया गांधींचं कौतुक केलं आहे. शरद पवारांनी काँग्रेस का सोडली याबाबत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या 'द कोअलिशन ईयर्स : १९९६-२०१२' पुस्तकामध्ये शरद पवार यांनी काँग्रेस का सोडली याबाबत खुलासा केला होता.


शरद पवार यांना काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवायचं होतं. वाजपेयी सरकार अल्पमतात आल्यानंतर काँग्रेस सोनिया गांधी यांच्याऐवजी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी सांगेल असं शरद पवारांना वाटलं होतं. मात्र असं न झाल्याने पवार नाराज झाले. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या ऐवजी पी.शिवशंकर यांच्याकडून सल्ले घेण्यास सुरुवात  केल्याने नाराज झालेल्या पवारांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असं या पुस्तकात म्हटलं आहे.