`साहेब अजूनही तरूण आहेत, एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान होईल`
आपण एकत्र लढल्याने महाराष्ट्रात काम सोपे झाले.
औरंगाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. ते मंगळवारी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार पंतप्रधान होण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. साहेब अजूनही तरूण आहेत. आपण एकत्र लढल्याने महाराष्ट्रात काम सोपे झाले. आता २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो तर मराठी माणसाला पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. आता शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना पाठिंबा देईल'
यापूर्वीही अनेकदा शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याबद्दल प्रचंड चर्चा होती. त्यासाठी शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता. मात्र, शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढवणे टाळले होते. मात्र, त्यावेळीही शिवसेनेने शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारूण पराभवानंतर ही चर्चा थंडावली होती.
मात्र, आता महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील पक्षीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातामधून सत्ता गेल्यास राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून ठेवणारा नेता म्हणून पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचे नाव अग्रस्थानी असेल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.