दीपक भातुसे, झी मीडिया, कर्जत : संभ्रमावस्थेतून जाणार्‍या आणि अस्तित्वासाठी झगडणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चिंतन शिबिरात पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षबांधणीबरोबरच सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला पाठिंबा नाही, २०१९ मध्ये काँग्रेसबरोबर आघाडी आदी मुद्दे राष्ट्रवादीने आपल्या चिंतन शिबिराच्या पहिल्या दिवशी स्पष्ट केले. तर २०१९ साली शरद पवार पंतप्रधान होतील, असा विश्वास या शिबिरात पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.


रायगडमधील कर्जतला राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर


2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सुरुवात झाली. २०१४ साली भाजपाने सर्वाधिक जागा पटकाविल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला, तेव्हा पासून राष्ट्रवादीही भाजपाची बी टीम असल्याची टीका होऊ लागली. 


सरकारमध्ये शिवसेनेची जागा राष्ट्रवादी घेणार नाही


दुसरीकडे मागील तीन वर्षात भाजपाच्या नेत्यांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखवलेली जवळीक ही बाब आणखी अधोरेखित करत होती. राज्यात शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी पाठिंबा देईल असंही बोललं जाऊ लागलं. 


कार्यकर्त्यांमध्येही हा संभ्रम होता. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढत होती. हा संभ्रम चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या नेत्यांनी केला. शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी ती जागा राष्ट्रवादी घेणार नाही असं पक्षाने स्पष्ट केलं.


लोकसभा, विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज


२०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. आता मात्र २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज राष्ट्रवादीला वाटत असून तसे संकेतही पक्षाने चिंतन शिबिरात दिले आहेत.


सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत


देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात वातावरण पेटत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे २०१९ ला शरद पवार पंतप्रधान होतील असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतो आहे.


समारोप शरद पवार यांच्या भाषणाने होणार


2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने या चिंतन शिबिराद्वारे केली आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडली. या शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या भाषणाने होणार आहे. त्यामुळे पवार या सर्व मुद्यांवर काय भूमिका घेतात तेही महत्त्वाचे आहे.


राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप


राज्यात सलग १५ वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. तर पक्षाचे दोन आमदार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत. त्यामुळे पक्ष वाढवण्याबरोबरच पक्षाची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान पक्षासमोरी आहे. त्यासाठी पक्ष काय भूमिका घेणार हा खरा प्रश्न आहे.