मोदी, राष्ट्रवादी पक्ष हा कोणा एकट्या दुकट्याचा नाही - शरद पवार
पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना पवार यांनी सूचक इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणा एकट्या दुकट्याचा नाही, तर तो रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी मोठा केलेला आहे. त्यामुळे मोदींनी माझ्या पक्षाची काळजी करू नये म्हणत भाजप हा दोघांचा पक्ष आहे, असे सूचीत केले. दरम्यान, अजित पवार यांची पाठराखण करताना उत्तम प्रशासक असल्याचा दाखला यावेळी पवारांनी दिला. देशामध्ये दुष्काळाचे वातावरण असल्याने मोदी त्यावर काही तरी बोलतील, अशी अपेक्षा होती. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य झालेल्या ठिकाणी शेवटच्या घटकांचा विचार ते करतील असेही वाटले होते, पण त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत टीका केली, असे शरद पवार यांनी महाआघाडीच्या मेळाव्यात स्पष्ट केले.
वर्ध्या येथे पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या जाहीर सभेत पवार कुटुंबियांवर हल्लोबोल केला होता. त्यामुळे या मेळाव्यामध्ये शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पवार यांनी मोदी यांनी केलेल्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले. गेल्या दोन वर्षामध्ये 15 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाची किंमत शेतकऱ्यांना दिली जात नाही. राफेलमध्ये ना खाऊंगा, ना खाऊंगा म्हणणाऱ्यामध्ये कोणी खाल्ले हे लवकरच देशाला समजेल. घटनेने दिलेले अधिकार सरकारकडून उध्वस्त होण्याची भीती आहे. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना अद्याप आरक्षण दिलेले नाही, अशी टीका राज्यसरकारवर पवारांनी केली.
तर दुसरीकडे अजित पवार यांनीही मोदींवर टीका केली. मावळ गोळीबाराचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले तर राजकारणातून निवृत्ती घेऊ, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांना दिले आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात कोणतेही काम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. कालच्या सभेत पंतप्रधानांनी बेरोजगारी, महागाई, जीएसटी, महिलांचे प्रश्न यावर बोलायला हवं होते. मात्र वर्ध़्याला येऊन पंतप्रधान पवार कुटुंबावर बोलले. आमच्या कुटुंबात तुम्ही का लक्ष घालता. आमचे आम्ही पाहून घेऊ, असा पलटवार अजित पवार केला.
पवार कुटुंबीय कालही एक होत, आजही एक आहे, उदयाही एक राहिल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मोहन जोशी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. याचवेळी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली. या संयुक्त बैठकीला अजित पवार, मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि इतर नेते उपस्थित होते. मात्र उमेदवारी साठी इच्छुक असलेले प्रविण गायकवाड मात्र यावेळी उपस्थित नव्हते.