Sharad Pawar :  महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या सूत्राबाबत शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. निवडून येणारी जागा घेणं एवढाच महत्त्वाचा निकष महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष किंवा शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना शिंदे पक्ष निवडणूक लढवली जाणार नसून, निवडून येण्याची क्षमता यावरच संबंधित जागा पक्षाला सुटणार असल्याचं बैठकीत ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय. कोणता पक्ष किती जागा लढणार यापेक्षा सत्ता आणणं या महत्त्वाच्या मुद्द्यावरच मविआची निवडणूक रणनीती ठरवली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. 


जेवढ्या जागा निवडून येणार तेवढ्या जागांवरच प्रत्येक पक्षानं लढावं अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच मविआतील अतिशय चुरशीच्या जागांची फार तर एक-दोन ठिकाणी बदली होईल. अन्यथा ज्या जागा आहेत त्या जागांवरच घटक पक्ष लढतील असंही बैठकीत ठरल्याचं समजतंय. 


दरम्यान, मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीला सुरुवात झालीये...शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून संजय राऊत अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि  काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते या बैठकीला उपस्थीत आहेत. आज आणि उद्या मविआची बैठक होणार आहे.. आजच्या बैठकीत तिढा असलेल्या 30 ते 35 जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर पितृपक्ष संपताच तिनही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे..


अहेरी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी,अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य उमदेवाराला इथून संधी देण्याची गरज असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेत.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री  यांना अहेरीतून मैदानात उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रयत्न आहे.