बारामती : एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. पण अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित व्यक्तिंच्या घरी छापे टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीतील (Baramati) गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. छापेमारीनंतर चौकशी अद्याप सुरु आहे, चौकशीनंतर सविस्तर बोलता येईल असं सांगून पवार म्हणाले, उत्तरप्रदेशात (lakhimpur kheri violence) शेतकऱयांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. 


हा तर अधिकाराचा अतिरेक


यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेवून आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब असल्याचं पवार म्हणाले. 


मुंबई ड्रग्स कारवाईत पक्षीय लोक


मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेवून जाणारे लोक शासकिय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आली की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाईवेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नव्हे. याचा अर्थ या कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आलं होतं. ड्रग्ज प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, पण ती या पद्धतीने नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल


स्थानिक स्वराज्य संस्थांसह काही पोटनिवडणूकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर शंभर टक्के निकाल त्यांच्या बाजूने जाईल असंही शरद पवार म्हणाले. 


गडकरी पक्षीय अभिनिवेश नसलेले नेते


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत राज्यात विविध कार्यक्रमांना मी हजेरी लावली. केंद्रामध्ये काम करणारे गडकरी हे पक्षीय़ अभिनिवेश न ठेवता सहकार्य करणारी व्यक्ती आहेत. राज्यात मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ते दळणवळणाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो असंही पवार म्हणाले.