मुंबई: माढ्यातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला आहे. माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि दीपक साळुंखे यांची नावे चर्चेत आली आहेत. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोहिते पाटील घराण्यात उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपाशी जवळीक वाढल्यामुळे मोहिते-पाटील घराण्याबाबत राष्ट्रवादीत नाराजी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री


माढ्यात गटबाजी उफाळण्याचा धोका लक्षात घेऊनच शरद पवार यांनी येथून लढावे, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी माढ्यातून लढण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे माढ्यातील राष्ट्रवादीचे नेते एकदिलाने काम करतील, असे वाटत असतानाच पवारांनी अचानकपणे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थला मावळमधून उमेदवारी देण्यासाठी हट्ट धरला होता. परिणामी एकाच घराण्यातून किती लोकांनी लढावे, यावर मर्यादा असली पाहिजे, असे सांगत शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता माढ्यातून कोण उभे राहणार, हा पेच निर्माण झाला. तर दुसरीकडे पवारांच्या माघारीमुळे स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.