पुणे : २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने बाजारात आणलेल्या बॉण्ड अर्थात कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना २१ गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यापैकी ७.५९ टक्के असा सर्वात कमी व्याजदर आकारणाऱ्या कंपनीने पुढच्या १० वर्षांसाठी हे कर्जरोखे खरेदी केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पहिल्याच दिवशी दोनशे कोटींची भर पडलीय. पुण्यामध्ये सगळीकडे २४ तास समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठीची योजना महापालिकेनं हाती घेतलीय. त्यासाठी २२६४ कोटी रुपये कर्जरोख्याच्या माध्यमातून उभारण्याचा धाडसी निर्णय महापालिकेनं घेतलाय.  


विकासकामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जरोखे काढणारी पुणे ही देशातली पहिली महापालिका ठरलीय. महापालिकेतल्या विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला असला तरी शेअर बाजारात त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय.  त्यासाठी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी पुणे महापालिकेचे अभिनंदन केलंय. 


दरम्यान या कर्जरोख्यांची नोंदणी करण्यासाठी मुंबई शेअर बाजारात २२ जूनला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.  केंद्रीय मंत्री वेंकया नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.