Shasan Apya Dari: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारच्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. कार्यक्रमापेक्षा त्यासाठी केलेल्या जाहीरांतीमुळे हा उपक्रम चर्चेत आला आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाचा नागरिकांना लाभ होत नसल्याची टिका विरोधकांनी केली होती. दरम्यान आता या उपक्रमासाठी करण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. 


'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी 52 कोटी 90 लाख 80 हजार इतक्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे. विधानपरिषदेत सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे.


यापूर्वी विरोधकांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप केला होता. 


दरम्यान शासन आपल्या दारी योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकांची कामे होत असल्याने लोक या ठिकाणी येतात परंतु काही लोकांना या उपक्रमाची पोटदुखी झाली आहे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली होती. 


शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. गर्दी कशाला जमवता अशी टीका आमच्यावर होते. आम्ही चांगले काम केले, जनतेला लाभ दिला तरी त्यांच्या पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, कुणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांना औषध देण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदे यांना आणले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.