रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा दावा करणाऱ्या ह.भ.प. इंदुरीकर महाराजांवर सध्या टीकेचा झोड उठली आहे. या सगळ्या प्रकारामुळे मी व माझे कुटुंबीय उद्विग्न झालो आहोत. हे सगळे लवकर थांबले नाही तर कीर्तन सोडून शेती करेन, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले होते. दरम्यान सोशल मीडियातून इंदुरीकर महाराजांना पाठींबा मिळताना दिसतोय. तसचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी इंदुरीकर महाराजांना समर्थन जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होत नाही, मात्र चुकीच्या पद्धतीने इंदुरीकर महाराजांच्या वर टीका सुरु असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली आहे. सांगलीमध्ये रघुनाथ दादा पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


इंदुरीकर महाराज शेतकरी, महिला आणि तरुणाचं चांगल्या प्रकारे प्रबोधन करत असतात. पुराणात लिहिल्या मुद्द्यांच्या इंदुरीकर महाराजांनी वक्तव्य केलं मात्र चुकीच्या पद्धतीने इंदुरीकर महाराजांवर टीका सुरू असल्याचे ते म्हणाले.



इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाचा कार्य सुरू ठेवावे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असुदे आपण त्याचा पाठपुरावा करू. आम्ही तुमच्या सोबत आहे असे ही पाटील यांनी यावेळी म्हटले.


महाराजांसाठी सुरक्षारक्षक


या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर जिल्ह्यातील भिंगार गावात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले. यावेळी इंदुरीकर महाराजांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात असल्याचे दिसून आले. सुरक्षारक्षकांच्या कडेकोट पहाऱ्यात त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. सुरुवातीला हे कीर्तन होणार की नाही, अशी कुजबुज लोकांमध्ये सुरु होती. मात्र, इंदुरीकर महाराज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत गावात पोहोचले. 


गाडीतून उतरल्यानंतर 'बाउन्सर'नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. उपस्थित लोकांनाही कीर्तनादरम्यान शुटींग न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.