नव्या वर्षात महामुंबईतील प्रवास सोप्पा होणार; नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीत पोहोचा फक्त 10 मिनिटांत
Mahamumbai News Today: नव्यावर्षात महामुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. वाहतुक कोंडी व प्रवासाचे तास वाचणार आहेत. काय आहे नेमकं जाणून घेऊया.
Mumbai News Today: नववर्षात नवी मुंबई व ठाणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार आहे. महामुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील विविध ठिकाणी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नव्या वर्षात नवी मुंबई आणि कल्याणच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या प्रकल्पांमुळं कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महामुंबईचे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. तसंच, वाहतुककोंडीतून मुक्ती मिळणार आहे. ऐरोली आणि कटाईच्या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यास नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंतचे अंतर 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या हेच अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटांहून अधिकचा वेळ लागतो.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला आहे. तसंच, यासंबंधी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश केले दिले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळफाटा पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून 15 जानेवारीपर्यंत या पुलाच्या तीन मार्गिका प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहेत. ऐरोली-कटाई एलिवेटेड मार्गाची डाव्या बाजुची मार्गिका फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तसंच, शिळफाटा-म्हापे रोडच्या विस्तारिकरणाचे कामही करण्यात येणार आहे.
अनेक प्रोजेक्ट सुरू
शिळफाटा-कल्याण रोड सहा मार्गिका करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, मुंब्रा वाय जंक्शन पुलाच्या निर्माणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. इथेच ऐरोली-कटाई उन्नत मार्ग, शिळफाटा फ्लायओव्हरचे बांधकामही सुरू आहे. महापे रोड पाइपलान रस्तेमार्गावरही फ्लायओव्हरचे निर्माण केले जाणार आहे. खासदार शिंगे यांनी पलावा जंक्शनवर बांधकाम सुरू असलेला उड्डाणपुल आणि कटाई उन्नत मार्गाच्या बोगद्याचे निरीक्षण केले आहे.
बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होणार
कटाई उन्नत मार्गावरील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंब्राहून थेट ठाणे-बेलापूर मार्गावर जाणे शक्य होणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते कटाईपर्यंतचे अंतर 45 मिनिटांवरुन फक्त 5 ते 10 मिनिटांवर येणार आहे. ऐरोली कटाई उन्नत मार्गाची एकूण लांबी 12.3 किमी आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूरहून राष्ट्रीय राजमार्ग संख्या 4 पर्यंत एकूण लांबी 3.43 किमी आहे. या मार्गावरील बोगदा 1.68 किमी लांबी आहे.