Shinde vs Thackeray: `मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही` म्हणणाऱ्या CM शिंदेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, `सभेतील मोकळ्या खुर्च्या...`
Shinde vs Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्ध कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला छोटं म्हणत उपहासात्मक टीका केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आता एक नवं आव्हान दिलं आहे.
Shinde vs Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वरळीतून (Worli) निवडणूक लढण्याचं आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपण छोटी आव्हानं स्वीकारत नाही म्हणत टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी वरळी कोळीवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला (Shinde on Aditya Thackeray Challenge) उत्तर दिलं. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिदेंना आणखी एक आव्हान दिलं आहे.
आदित्य ठाकरेंनी काय आव्हान दिलं होतं?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाला लक्ष्य केलं असून दोन माजी नगरसेवकांना गळाला लावण्यात यश मिळवलं आहे. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. ‘‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवावे’’ असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते.
एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कार्यक्रम असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. ‘‘मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारून स्वत:ला सिद्ध करून दाखवतो. सहा महिन्यांपूर्वीच मी मोठे आव्हान स्वीकारले आणि जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले’’, असं प्रत्युत्तर यावेळी त्यांनी दिलं.
आदित्य ठाकरेंचं नवं आव्हान
"मुख्यमंत्री जर वॉर्डमध्ये निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्यासमोर मी वॉर्डातही निवडणूक लढायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना मी वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं, नंतर ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिलं, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. आता एक नवं आव्हान देतो की, पुढच्या अधिवेशनाच्या आधी त्यांनी किमान राज्यपालांना बदलून दाखवावं," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. किमान हे राज्यद्रोही राज्यपाल बदलले तरीसुद्धा पुरेसं असल्याचा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
"कुणाच्या फ्लॉप शोबाबत मी बोलणार नाही, त्याची खिल्ली उडवणार नाही. त्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या यावरून मला कुणाची खिल्ली उडवायची नाही. पण गर्दी कुठे होते हे राज्यातली जनता पाहते," असेही आदित्य ठाकरे म्हणाले. वरळीत आलेले कोळी बांधव कुठल्या राज्याचे होते हे सगळ्यांनी पाहिलं आहे, वरळीत असणारे कोळी बांधव हे आमच्या सोबत आहेत असं आदित्य म्हणाले.
"कालची सभा उधळण्यात जर विरोधक म्हणजे शिंदे गटाचे लोक असतील, गद्दार लोक असतील तर त्याची चौकशी व्हावी," अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.