विकास गावकर, सिंधुदुर्ग : कोकणातील मानकऱ्यांच्या वादातून एकाच मंडपात चक्क दोन नाटक होण्याचा विचित्र प्रकार सिंधुदुर्गात घडलाय . खरतर कोकणातील देवस्थानचे वाद हे नवीन नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे वाद किती पराकोटीला पोहोचू शकतात हे या प्रकाराने दिसून आलेय . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालेली येथे घडलेल्या प्रकाराने गावची जत्रा आणि दशावतारात जीव गुंतलेल्य़ा प्रत्येक कोकणवासियाला धक्का बसलाय. 


दिवाळी संपली की सिंधुदुर्गातील गावागावातील मंदिरात जत्रोत्सवाचा रंग चढतो.. आणि मग कानात निनादतात दशावताराचे आवाज.. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुरु होणा-या या दशावताराचे गावक-यांप्रमाणेच मुंबईच्या चाकरमान्यांनाही अप्रपु असते. 


एका दशावतारासाठी पंचक्रोशी जत्रोत्सवाच्या मंदिरात एकवटते.. पण अशाच एका जत्रेनं मानक-यांचा मान मोठा झाला आणि चक्क एकाच मंडपात दोन गणपती नाचले आणि दोन राजांची दोन नाटक रंगली. १५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील  कालेली गावात श्री देवी माउलीचा जत्रोत्सव होता. मात्र गेली काही वर्ष दोन मानक-यांमध्ये असलेला वाद या जत्रोत्सवात उफाळला होता. 


दोन्ही गटांना दशावतार सादर करण्यावर अडून बसले.. आणि रात्री एकाचवेळी दोन पायपेट्यांच्या सूरांनी गणराजाला आळवले. दोन राजसिंहासनासाठी दोन नाटकांनी एकाच जागी एक अखंड रात्र गाजवली..आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या या दोन दशावतारी नाटकांच्या डबल स्क्रिन मनोरंजनामुळे फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलय. 


कोकणातील देवस्थानचे हे वाद काही नवे नाहीत. होळीच्या वादावरुन अनेक देवस्थानाना टाळं लागलीत. देवापेक्षा माझा मान मोठा म्हणत  देवस्थान बंद झाल्यामुळे अनेक माहेरवाशिणींना सणांचा आनंद हिरावला गेलाय. एकाच मंडपातील दोन दशावतारी नाटकांमुळे मानापमानाचा संकासूर खtप मोठा झाला तर मग पिढ्यानपिढ्या जपलेले या संस्कृतीच्या गाथा आम्ही पुन्हा शोधायच्या तरी कुठे याचं उत्तर आता मानक-यांनीच द्यावं.