शिर्डी : चीनपासून सुरु झालेल्या कोरोना वायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभुमीवर शिर्डी संस्थानाने देखील महत्वाची पाऊले ऊचलली आहेत.


बायोमेट्रीक बंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी साईबाबा संस्थानने अनेक उपाययोजना करण्यास सुरूवात केलीय. दक्षता म्हणून आजपासून बायोमेट्रीक दर्शन पास व्यवस्थेत बोटाचे ठसे घेण्याचं बंद केलं आहे.



इन्फ्रारेड तपासणी 


कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद केलीय. मंदिरात भक्तांना गंध चांदीच्या काडीने लावला जातोय. गेल्या १३ दिवसांत शिर्डीत साडेचार लाख भाविकांनी दर्शन घेतलं. मंदिर परीसरात भक्तांची इन्फ्रारेड तपासणी केली जातेय.


मुख्यमंत्र्यांची घोषणा 


कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 


मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधल्या जीम, स्विमिंग पूल, थिएटर  आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा बंद राहणार आहेत, पण इतर शहरांमधल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या शाळा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. शहरांमधले मॉल सुरु राहणार, पण तिकडे गर्दी करु नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.


नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. शक्य असेल तिकडे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी द्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल, तर ती रद्द करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.