शिर्डी : शिर्डीकरांचा बेमुदत बंद मागं घेण्यात आला आहे. शिर्डीकरांनी घेतलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत शिर्डीकरांनी याची घोषणा केली आहे. सरकारनं साईजन्मभूमीविषयी चुकीची भूमिका घेऊ नये अशी अपेक्षाही शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदबाबत अनेक भक्तांना माहितीच नव्हती. त्यामुळं अनेक भक्तांना राहण्याखाण्याची सोय करण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर हा वाद सुरु झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली पाथरीकरांनी केली. राज्य सरकार यावर विकास आराखडा तयार करुन लवकरच भूमिपूजन केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर शिर्डीकर आक्रमक झाले. यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद सुरु झाला.


शिर्डी बंदमुळे साईंच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भक्तांचे हाल झाले. शिर्डीत हॉटेल्स, लॉज आणि बाजारपेठ बंद असल्यानं भाविकांची मोठी धावाधाव झाली. वार कोणताही असो, शिर्डीत साईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त नेहमी येत असतात. शिर्डी बंद असल्यानं अनेक भक्तांना राहण्यासाठी खोली मिळाली नाही. शिवाय हॉटेल्स बंद असल्यानं भक्तांचे खाण्यापिण्याचे हाल झाले.


पण आज अडचणीत भक्तांच्या मदतीला साईंचं प्रसादालय धावून आलं. प्रसादालयात आज ५० हजार अतिरिक्त नास्त्याची पाकिटं बनवण्यात आली होती. शिवाय जेवणाचीही जादा व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं अडचणीत असलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला.