Shiv Jayanti 2023 : राज्यासह देशभरात आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज  (chhatrapati shivaji maharaj)  यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरही (Shivneri Fort) शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) देखील उपस्थित होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यापासून रोखल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी हातात माईक घेत सरकारला सुनावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही बोचरी टीका केली आहे. किल्ले शिवनेरीवरही महाराष्ट्राचा व्यापार करणार आहात का असे संजय राऊत म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज हे जनसामान्यांचे राजे होते. पण आज नव्या सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेपासून तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय का अशी शंका यायला लागली आहे. शिवनेरीवर सामान्यांना प्रवेश नसेल तर तिथं काय दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार आहेत का? तिथेही महाराष्ट्राचा व्यापार करणार आहेत?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.


आम्ही किती सहन करायचे? -  छत्रपती संभाजीराजे


"किल्ले शिवनेरीवर येत असताना मला शिवभक्तांनी अडवलं. तेव्हा त्यांनी मला विचारले की व्हीआयपी पासेस का? आम्ही सुद्धा शिवभक्त असून आम्हाला अडवलं जात आहे. तुम्ही दर्शन घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येणार असे त्यांनी मला सांगितले.  तुम्हाला शासकीय कार्यक्रम करायचा असेल तर करा पण दुजाभाव नको. वर येऊन दर्शन घेऊ दिलं जात नाही हे चालणार नाही. दरवर्षी हेच होत आहे. आम्ही किती सहन करायचे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा दुजाभाव करु नका," असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांना दिला.


"रायगडावर नतमस्कत होण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र इथे का नाही? इथे राज्याचे पुरातत्व खाते आहे. पण हा कुठला नियम आहे? रायगड किल्ल्याप्रमाणे बाकीच्या गडकोटांचे संवर्धन कसे करणार याचेही उत्तर आम्हाला पाहिजे आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला सर्वांना आत जाऊन दर्शन घेण्याची परवानगी हवीय. पुढच्या वर्षी याचे नियोजन करा," असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.