शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार शिवजन्मोत्सव सोहळा
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
पुणे : शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा होतो आहे. किल्ले शिवनेरीवर शिवाईदेवीची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम सहपत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी चिमुकल्या मुलांसह महिला, तरुणाई मोठ्या संख्येनं काल रात्रीपासून शिवनेरी दाखल झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने शिवनेरी गडावर मोठी तयारी करण्यात आली आहे. गडावर साहसी खेळांची प्रात्यक्षिके होणार आहेत. शिवनेरी गडावर राज्यभरातून शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात आज उत्साहात साजरी होत आहे.