देवेंद्र कोल्हटकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या फोनाफोनी सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची वाढलेली फोनाफोनी काही तरी शिजतंय हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.शिवसेनेला केवळ अडीच वर्षेच नव्हे तर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. यावेळी शिवसेनेसोबत अदृश्य हात असणार का याची चर्चा आता जोर धरू लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तास्थापनेबाबत सध्या कोणत्याच राजकीय पक्षाशी कुणाचीही चर्चा सुरू नाही. भाजपा आणि शिवसेनेत अबोला आहे. काँग्रेसही स्वस्थ बसलीय, पण राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. त्याचच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेनेकडं १७५चा बहुमताचा आकडा असल्याचा दावा केलाय.


शिवसेनेकडे १७५ च्या बहुमताचा आकडा कसा आला ? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. शिवाय शरद पवार मुख्यमंत्री होतील या चर्चेचाही इन्कार केला आहे.



एकमेकांना टोले प्रतिटोले देणं सुरु असतानाच संजय राऊत आणि अजित पवारांची फोनाफोनीही सुरु आहे. अजित पवारांनी संजय राऊतांचा मॅसेज पत्रकार परिषदेतच वाचून दाखवला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा मेसेज आला आहे. 'नमस्कार संजय राऊत जय महाराष्ट्र' असा मेसेज संजय राऊत यांनी अजित पवार यांना केला. त्यांना काय बोलायचे आहे माहित नाही, नंतर फोन करून विचारेल असं बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.


तर आता या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तर महायुतीने लवकर सरकार स्थापन करावे. त्याचप्रमाणे पवार साहेब मुख्यमंत्री होणार याची सुतराम शक्यता नसल्याचे देखील ते या बैठकीत म्हणाले आहेत.


तर, नुकताचं झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आपल्याकडे १७५ आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगीतले होते. त्यावर शिवसेनेकडे १७५ चा आला कुठून हे त्यांनाच माहित असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनीही संजय राऊतांना फोन केला. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि सोनिया गांधीच घेतील, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.


नेत्यांनी एकमेकांना फोन करण्यात काही गैर नाही. पण सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची वाढलेली फोनाफोनी काही तरी शिजतंय हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. यावेळी शिवसेनेसोबत अदृश्य हात असणार का याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.