मुंबई, नागपूर, रत्नागिरी, बीड : भाजप-शिवसेनेच्या उमेदवारी याद्या जाहीर होताच अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. नांदेड जिल्ह्यातला लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यानं खासदार प्रताप पाटील चिखलीकर नाराज झालेत. मुलगा प्रवीण चिखलीकर यांच्यासाठी खासदार प्रयत्नशील होते. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा आमदार असताना चिखलीकरांनी बंड केल्यामुळे शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखा तगडा उमेदवार पाडूनही पक्षाने लोहा शिवसेनेला सोडल्यामुळे चिखलीकरांचे कार्यकर्ते नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मार्ग काढला नाही तर बंडाचा झेंडा उभारण्याची मागणी केली जातेय. तसे झाले तर शिवसेनेचे प्रचंड नुकसान होईल, असा इशारा खासदार चिखलीकर यांनी दिला आहे. 


कोकणात बंडखोरीची लागण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात शिवसेनेचे वर्चस्व कायम दिसून येत आहे. गुहागरमधून भास्कर जाधव हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पदाधिकारी हे जाधव राष्ट्रवादी असताना त्यांच्याकडून दुखावले गेले आहेत. त्यामुळे ते किती काम करतील याबाबत शंका आहे. तर दापोली-मंडणगडमधून मंत्री रादास कदम यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार सूर्यंकात दळवी नाराज आहेत. तसेच भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य केदार साठे हे इच्छुक होते. त्यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केल आहे. त्यामुळे येथेही दगाफटका होण्याची शक्यता आहे. या मतदार संघातून दोन जण नाराज आहेत. त्याचाही मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


भाजपने यांचे तिकीट कापले


नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर भाजपचे दक्षिण नागपूर विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. तिकीट कापल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षाने पुनर्विचार करावा, माझे काय चुकले हे सांगावे, आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची वाटचाल ठरवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


कोहळे यांच्या प्रतिक्रियेतून बंडखोरीचे संकेत मिळत आहे. कोहळे यांच्या घरासमोर समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर तिकडे दक्षिण नागपूर मधून उमेदवारी मिळालेल्या मोहन मते यांच्या कार्यालयासमोर जल्लोष सुरु होता.


भाजपचे कार्यकर्ते आक्रमक 


 कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याविरोधात आता भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करण्याचा उघड उघड इशारा शिवसेनेने दिला होता.


तीन जणांचा पत्ता कट, चार नवे चेहरे


पुण्यात भाजपच्या तीन विद्यमानांचा पत्ता कापला गेला आहे, तर एकूण चार नवीन चेहरे पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत. असे असलं तरी प्रस्थापितांनाच संधी दिली गेली असल्याने वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 


सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यावरून भाजप कार्यकर्ते सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. भाजप इच्छुक  उमेदवार प्रा. अतुल देशकर यांच्यासह खासदार आणि प्रमुख नेते मुख्यमंत्री भेटीला मुंबईत पोहचले आहेत. 


या क्षेत्रातील साधे तालुका प्रमुख नसताना ही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कुठल्याही स्थितीत ब्रम्हपुरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला घेण्यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोंदियाच्या तिरोडा मतदारसंघाच्या बदल्यात ब्रह्मपुरीचा बळी घेतल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. 


शिवसेनेत बंडखोरी उफाळली


नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये शिवसेनेत जोरदार बंडखोरी उफाळली आहे. विद्यमान आमदार नागेश पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने ही बंडाळी उफाळली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली.


या घटनेच्या निषेधार्थ हदगाव हिमायतनगर तालुक्यात शिवसैनिकांनी जागोजागी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान,  आपल्याकडे पैसे नसल्याने आपणास उमेदवारी दिली नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.