कोल्हापूर : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमैया यांच्यासह अन्य नेते दिवसागणिक शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत, महापौर किशोरी पेडणेकर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर तर दररोज टीका आणि आरोप होत आहेत. मात्र, त्या दोघांनीही आपला संयम सोडलेला नाही. उद्धव ठाकरे हे गेल्या चार महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्या आजारपणावरूनही भाजपने टीका केलीय.


आपल्या आई, वडिलांवर टीका होत असताना कोणता मुलगा शांत राहील? होणारे आरोप सहन करेल? पण, आदित्य ठाकरे यांनी त्या आरोपांना ना कधी उत्तर दिले ना कधी त्या वादात पडले. त्यांचा हा सुसंस्कृतपणा आजही कोल्हापूरमध्ये दिसून आला.


उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे जेष्ठ पुत्र आणि राज्याचे पयर्टन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिर परिसरात पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या आरोपांबाबत विचारले असता 'माझ्या हातून चांगले काम होऊ दे असे साकडे महालक्ष्मीला घातले आहे. मंदिर परिसरात मी काही राजकीय बोलणार नाही.' असे सांगितले.


गेले दोन महिने आपण बघत असाल, उत्तर प्रदेशातील बेरोजगारी, तिथल्या समस्या यावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष इथं काम करत आहेत. टीका करताना विरोधी पक्षाने खालची पातळी गाठली आहे. या विषयात मी जाणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू, असं ते म्हणाले.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. त्यांना खूप नैराश्य आलं आहे, त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी आरोप प्रत्यारोपाच्या वादाला उडी घेणं टाळत आपल्या सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं.