शिवसेना-भाजप-एमआयएम-काँग्रेस-राष्ट्रवादीची अनोखी युती
शिवसेनेच्या मदतीला धावले सगळे पक्ष...
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले आहेत. त्यांना 647 पैकी तब्बल 524 मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवाराला अवघे 106 मतं पडली, युतीची मतदारसंख्या 294 असतांना नक्की दानवेंना इतकी मतं पडली तरी कशी.
औरंगाबादेत शिवसेनेनच्या विजयाचा हा जल्लोष सुरू आहे तो एमआयएम आणि काँग्रेसच्या मदतीच्या जीवावर. शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत विक्रमी 524 मतं मिळवली. काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना 106 मतं मिळाली.
महत्वाचं म्हणजे युतीची मतसंख्या 294 असताना अंबादास दानवे यांना 524 मतं मिळाली, यामध्ये एमआयएमची 27 मतं आहेत. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी 60 मतांची शिवसेनेला मदत केल्याचं बोललं जातं आहे. काँग्रेसची 250 मतं असतांना बाबुराव कुळकर्णींना अवघी १०६ मतं मिळाली.
पराभूत उमेदवार बाबूराव कुळकर्णी यांनी पराभवाचं खापंर घोडेबाजारावर फोडलंय. वैतागून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदाचा राजीनामा देऊन टाकला
मतदानाआधी अंबादास दानवे आणि बाबुराव कुळकर्णी यांनी घोडेबाजार करणार नाही असं जाहीर पत्रक काढलं होतं, त्यानंतरही शिवसेना अनेकांना सहलीला घेऊन गेली. गुप्त बैठकीच्या माध्यमातून एमआय़एमलाही गळाला लावलं. चाणाक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादीलाही सोबत घेतलं. आणि या कुटनितीच्या जीवावर शिवेसनेनं मोठा विजय मिळवला.