मुंबई : महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार रविंद्र वायकर उपस्थित होते. वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात गजानन कीर्तीकरांनी अर्ज दाखल केला. गजानन कीर्तीकर आणि संजय निरुपम यांच्यात मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात दुहेरी लढत रंगणार आहे. गजानन कीर्तीकरांनी २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा १ लाख ८३ हजार २८ इतक्या मताधिक्याने पराभव केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच २०१४ मध्ये मनसेकडून या मतदारसंघात अभिनेता महेश मांजरेकर रिंगणात होते. तर आम आदमी पक्षाकडून मयांक गांधी हे देखील निवडणूक लढवत होते. या निवडणूकीत मनसेला ६६ हजार ८८ मतदान झाले होते. तर आप पक्षाला ५१ हजार ८६० इतकी मतं मिळाली होती.


पण यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसे आणि आप या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. या निर्णयामुळे गजानन कीर्तीकर यांच्यापुढील आव्हान कमी झालं आहे. अर्ज भरण्यापूर्वी गजानन कीर्तीकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांसोबत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी म्हाडा गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.