निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला दे धक्का, जिल्हा सहसंपर्कप्रमुख काँग्रेसमध्ये
शिवसेनेत नाराजी कायम दिसून येत आहे. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लातूर : शिवसेनेने आधी स्वबळाचा नारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम राहिली होती. आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव केला आहे की, स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा अनेक कार्यक्रमात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आपली भूमिका बदलली आणि भाजपसोबत युती केली. त्यामुळे हा निर्णय अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पटलेला नाही. गेली चार वर्षे ज्यांच्याविरोधात काम केले. त्यांचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्न शिवसेनेच्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून विचारण्यात येत आहे. आजही भाजपसोबतच्या युतीबाबत काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षावर नाराज आहेत. ही नाराजी लातूरमध्येही दिसून आली. काहींही पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. लातूरचे शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपशी युती झाल्याने अभय साळुंके अस्वस्थ होते. यापूर्वी त्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. युतीमुळे राजकीय अडचण झाल्याने त्यांनी काँग्रेसची वाट धरली. निलंग्यातील एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जालन्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद टोकाचे गेले होते. शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी उघड बंड केले होते. कोणत्याही परिस्थिती आपण निवडणूक लढविणार, या मतावर खोतकर ठाम होते. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्याने येथे युतीमध्ये पेच निर्माण झाला. आम्ही दानवे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका खोतकर समर्थकांनी घेतली होती. त्यामुळे शिवसेना भाजपच्या विरोधात कायम असल्याचे चित्र येथे दिसून आले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत या जागेवरील तिढा सोडविला आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनात सल कायम असल्याची कुजबूज आहे. तसेच पालघर आणि सातारा येथील जागेचा प्रश्न सध्या सुटला असला तरी अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.