मुंबई : Shiv Sena Crisis and  Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शिंदे गट गोंधळलेला असून बंडाची दररोज नवी कारणं दिली जात असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लागवला आहे. राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. दीपक केसरकर, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील यांच्यावर राऊत यांनी शरसंधान केलं तर या आमदारांनीही प्रत्युत्तर देत राऊतांवर हल्ला चढवला आहे. 


तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते - राऊत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा त्यांनी मुंबईतून पलायन केलं तेव्हा ते बोलत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी निधी देत नव्हते. त्यांनी पक्ष का सोडला, बंडखोरी का केली, यासाठी त्यांनी स्वतःची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत पण नक्की कारण ठरवा गोंधळ करु नका. 2014 साली जेव्हा युती तोडली तेव्हाही लोक काही बोलली नाही. तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते. संघटनेच्या कामातच मी आहे. पक्षाची भूमिका मांडतो मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला फार क्वचित पाहिला असाल, असे राऊत म्हणाले.


'काहीही आरोप करायचे, शिवसेना खंबीर'


संजय राठोड यांच्या मागे उद्धव ठाकरे पडद्यामागे कसे ठामपणे उभे राहिले हे सर्वांना माहीत आहे. भाजपचीच लोक ही शरद पवार यांच्याबद्दल कौतुक करतात. शरद पवार यांच्यामुळे शिवसेना संपत आहेत, असे काहीही आरोप करायचे शिवसेना खंबीर आहे. चाळीस लोक जे गेलेले आहेत, त्यामुळे शिवसेनेचा एक कपाचा देखील उडालेला नाही, असे राऊत म्हणाले.


राजन विचारे जे ठाण्याचे खासदार आहेत. आनंद दिघे यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने लोकसभेत प्रतोद पदाबाबत पत्र आम्ही लोकसभेत संसदीय कार्यमंत्री यांना दिलेलं आहे. भावना गवळी या संसदेत येत नव्हत्या. मधल्या काळात कायदेशीर पेचामध्ये त्या सापडल्या होत्या, अशा काळात संसदेमध्ये कोणीतरी माणूस हजर पाहिजे, यासाठी सगळ्यांशी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून घेऊन हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.



आनंद अडसूळ यांच्या राजीनाम्याचे वृत्त आम्ही ऐकलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी कार्यवाही केल्या. त्यांच्या घरावर देखील ईडीच्या धाडी वाढल्या. त्यांच्याकडून देखील कडून अनेक बातम्या पसरत होत्या. तसेच व्यवसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) यांच्याबाबतही ऐकलंय. असं जर असेल तर ते दुर्दैव आहे. त्यांची चौकशी का सुरु होती आणि का थांबवली हे चौकशीचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं मी यावर जास्त बोलणार नाही, असे राऊत म्हणाले.



दरम्यान, दादा भुसे आणि सुहास कांदे हे दोन आमदार शिंदेंसोबत गेल्यानं नाशिकमधील पडझड टाळण्यासाठी संजय राऊत दौरा करणार आहेत. आज शिवसैनिक आणि पदाधिका-यांची बैठक घेऊन त्यात मार्गदर्शन करतील. 


बंडखोर आमदार पाहा काय म्हणाले?


उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं तर जाऊ, मात्र एकटा जाणार नाही सर्व एकत्र जाऊ असं विधान बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केलंय. सुहास कांदेंनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. ज्या माणसावर प्रेम केलं त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आता जी जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारेन असही यावेळी सुहास कांदेंनी सांगितले. 


शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनीही राऊतांवर हल्लाबोल केला. संभाजीनगर  विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उत्साही कार्यकर्त्यांनी शिरसाठांना खांद्यावर उचलून घेतलं. ही गर्दी बघितल्यावर शिवसैनिक कुणाच्या पाठीशी आहे, हे दिसतंय असं शिरसाठ म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली.