MLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता 14 आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ज्या गटाला मान्यता मिळेल त्या गटाच्या आमदारांची आमदारकी कायम राहणार आहे. मात्र आमदार अपात्रतेचा वाद 16 आमदारांवरुन सुरु झाला. आता याला 2 गटांमधील स्वरुप आल्याने 40 आमदारांची पात्रता या निकालावर अवलंबून आहे. पण 40 आमदारांनी बंडखोरी केलेली असताना 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातच याचिका का करण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
16 आमदारच का?
महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंनी जून 2022 मध्ये आपल्याच सरकारविरोधात बंड केलं तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16 आमदार होते. शिंदेंसहीत हे 16 आमदार सुरतला गेले होते. यानंतर मूळ शिवसेनेनं या बंडखोरीनंतर या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीला 48 तासांमध्ये उत्तर द्यावे नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर गुवहाटीला गेलेल्या शिंदे गटामध्ये मूळ शिवसेनेतील 40 आमदार मिळाले. अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आलेल्या 16 आमदारांबद्दलच्या प्रकरणातून पुढे 2 गटांतील वाद म्हणून त्यात शिंदे गटात असलेल्या 24 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. नोटीसमध्ये सुरतला गेलेल्या 16 आमदारांची नावं होतं. या नोटीसमध्ये कालांतराने शिंदे गटात सहभागी झालेल्या अन्य 24 आमदारांचा समावेश नव्हता. म्हणूनच बंडखोरी करुन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या 40 असली तरी अपात्रतेच्या कारवाईमध्ये 16 आमदारांचं नावं आहे.
शिंदे गट म्हणतो आम्हीच खरी शिवसेना
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्तवाखालील महाविकास आघाडी सरकार पडले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 30 जून 2022 रोजी शिवसेना-भाजपा सरकार सत्तेवर आले. शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदेंसह 40 आमदारांविरोधात ठाकरे गटाने अपात्रतेच्या याचिका अध्यक्षांपुढे सादर केल्या होत्या. दुसरीकडे शिंदे गटाने आपला गटच मूळ शिवसेना पक्ष असून बहुसंख्य आमदार, राष्ट्रीय वर राज्य कार्यकरिणीतील पदाधिकारी जिल्हाधिकारी, पदाधिकारी आपल्याबरोबर असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. निवडणूक आयोगानेही शिंदे गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली असून धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे.
ते 16 आमदार कोण?
एकनाथ शिंदे, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, महेश शिंदे, अनिल बाबर.