Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच 'खरी शिवसेना' असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. तसेच वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या गटाच्या पाठिंब्यावर सरकार स्थानप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


आदेश देण्याची गरज नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुरुवातीपासून हे सरकार मजबुत आणि भक्कम असल्याचं सांगत होतो असं म्हटलं आहे. "मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच माननिय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते," असं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


नक्की वाचा >> '...म्हणून आता आम्हाला उत्तम संधी'; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया


ठाकरे गटाला टोला


पुढे बोलताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचा थेट उल्लेख न करता त्यांना टोला लगावला आहे. "पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही," असंही म्हटलं आहे.


नक्की वाचा >> 'भाजपाच्या टेस्ट ट्यूबमधून जन्मलेल्या शिंदे..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिवसेना म्हणजे...'


मी पुन्हा सांगतो...


फडणवीस यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, "मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!" असा विश्वास व्यक्त केला. पोस्टच्या शेवटच्या ओळीमध्ये फडणवीस यांनी, "मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मी मनापासून अभिनंदन करतो," असं म्हटलं आहे.



लढाई सुरुच राहणार


दरम्यान, नार्वेकर यांनी दिलेल्या या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाद पुढे सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.