मुंबई : रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे. अयोध्येत बुरखाबंदी करण्याची मागणी करत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या प्रश्नाच्या उत्तराची मागणी केली आहे. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांच्यापुढे हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. ज्या प्रश्नाला श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा संदर्भही देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामी दहशतवादाला बळी ठरलेल्या श्रीलंकेची हतबलता आणि त्यावर ठामपणे घेण्यात आलेला बुरखा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे. फ्रान्स, श्रीलंका, न्यूझीलंड आणि ब्रिटन या देशांकडून दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत असतानाच भारतात असे निर्णय कधी घेतले जाणार असा थेट प्रश्न सत्ताधारी भाजपपुढे मांडण्यात आला आहे. 


विविध मार्गांनी चेहरा झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्र आणि समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतात ही बाब अधोरेखित करत श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांच्या निर्णयाची दाद देत अशा प्रकारच्या साहसाचं दर्शन रामाच्या अयोध्येत कधी घडणार हाच प्रश्न शिवसेनेकडून प्रकर्षाने मांडण्यात आला. 


बुरख्याचा इस्लामशी संबंधच नाही


बुरख्य़ाचा इस्लामशी काहीच संबंध नसल्याचं म्हणत भारतातील मुस्लिम समुदायाकडून अरब राष्ट्रांचं अनुकरण करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्यासाठी तेथील वातावरण आणि महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याच्या प्रथेवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पवित्र कुराण या धर्मग्रंथाचा उल्लेख धर्म आणि समाजव्यवस्था यांच्यात करण्यात आलेल्या गुंतागुंतीमुळे सामान्य मुस्लिम वर्ग भांबावून जातो आणि समाजाच्या काही अपरिवर्तनी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला गेला  तर हे धर्मावर घाला घातला जाण्याचं कृत्य समजलं जातं, असं म्हणत महत्त्वाचा मुद्दा या अग्रलेखातून पुढे आला. 


शहाबुद्दीन, आझम खान, अबू आझमी आणि ओवेसी बंधू यांना माथेफिरु म्हणत त्याच्यावरही टीका करण्यात आली आहे. त्यांची धर्मांधता देशाच्या सुरक्षेच्या आड येत असल्यास अशा परंपरा आणि धर्मांधता मोडित काढण्याचं धाडस मोदींनी केलं पाहिजे अशीच मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.