शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी
शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे.
परभणी : लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे. दोन कोटी रुपयांची सुपारी देऊन नांदेडच्या टोळीमार्फत आपल्याला संपविण्याचा कट शिजत असल्याचं त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण अद्याप कोणताही गुन्हा यात दाखल करण्यात आला नाही. मंगळवारी रात्री उशिरा खासदार जाधव यांनी स्वतःपोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. नांदेड इथल्या एका टोळीला दोन कोटी रुपयांची सुपारी देणारा व्यक्ती परभणीतील असावा, असा संशय आपल्याला असल्याचे या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे.
खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे वृत्त समजतात शिवसैनिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पूर्ण चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.