मुंबई : कोकणात (Konkan)शिवसेनेमध्ये (Shiv Sena) नाराजी दिसून येत होती. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदार संघातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते नाराज होते. त्यांची ही नाराजी लपून राहिली नाही. त्यांनी थेट जाहीरपणे ही नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांना मंत्रीपदासह महत्वाचे प्रदेश अध्यक्ष पद मिळाले होते. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते गुहागर मतदारसंघातून निवडूण आले. मात्र, त्यांच्याकडे मोठी जबादारी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता शिवसेनेने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भास्कर जाधव यांचे नाव आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद (Ratnagiri Zilla Parishad) अध्यक्षपदी त्यांच्या मुलाची वर्णी लावण्यात आली आहे. ते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या घरात आता रत्नागिरी जिल्ह्याचे महत्वाचे पद आले आहे.  


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी (Shivsena New Spokesperson) जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबर अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात खासदार प्रियंका चतुर्वैदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav),अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.


आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने नव्याने काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे.  


दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्यात येत आहे. तसेच सातत्याने आरोपाच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहेत. अनेक प्रकरणानंतर महाविकास आघाडीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सत्तेतील शिवसेनेला आक्रमक भूमिका घेता आलेली नाही. तसेच शिवसेना कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने नवीन प्रवक्ते निवडल्याची चर्चा आहे. यात भास्कर जाधव हे आक्रमक असल्याने त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.


माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू ठामपणे मांडणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे, संजय राऊत (Sanjay Raut) वगळता इतर कोणीही नेते या प्रकरणात जास्त भाष्य करताना दिसत नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भास्कर जाधव यांना स्थान दिल्याने विरोधकांचा चोख प्रत्युत्तर देण्याच्या नव्या फळीत त्यांचे नाव असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.