सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये: उद्धव ठाकरे
सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) `सामना`मध्ये प्रकट झाले आहे.
मुंबई : सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) 'सामना'मध्ये प्रकट झाले आहे.
शिवसेनेने महागाईच्या मुद्द्यावरून सरकारविरूद्ध मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली. या टीकेला प्रत्त्यूत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात भाजपचे वाभाडे काढले आहेत. सामनातून व्यक्त झालेली शिवसेनेची आजची भूमिका पाहिली असता भाजप शिवसेना आता फार काळ एकत्र नांदू शकणार नाहीत, असे चित्र दिसते.
'सामना'तील महत्त्वाचे मुद्दे
- सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली याचा इतका जळफळाट करून घ्याल तर त्या जळाजळीत तुमचीच राख होईल. त्यापेक्षा महागाई कमी करा. अर्थात आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत.
- सत्ता म्हणजे गुलामीच्या बेड्या नव्हेत असे मानणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. त्यामुळेच न पटणाऱया अनेक गोष्टींविरोधात परखडपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आम्ही कायम राखले आहे. शिवसेनेने महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले व त्याचा भडका शनिवारी मुंबईत उडाला, पण सत्ताधारी पक्षाच्या पिंपळावरील मुंज्यांना मुडद्यांच्या टाळूवरील लोणीही खायचे असल्याने त्यांनी महागाईविरोधी आंदोलनावर घाणेरड्या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
-‘महागाई’विरोधात आवाज उठवणे हा राज्यद्रोही, नालायक प्रकार असल्याची उलटी बोंब मारणे म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे. महाराष्ट्रात अशी सुरेमारी झाली असून जनता रक्तबंबाळ होऊन पडली आहे.
- भाजपच्या एका शहाण्याने सांगितले की, शिवसेना आता खाल्ल्या ताटात घाण करीत आहे. घाणीत लोळणाऱया डुकरांना सदान्कदा घाणच दिसते व घाणच त्यांचे सर्वस्व असते. काही मंडळींचा जन्म हा घाणीतच झाल्याने त्यांच्या मेंदूत व डोळय़ांत घाणच घाण आहे.
- मोदींचे राज आल्यापासून विकास दर घसरला आहे, उद्योगधंदा घटला आहे, रोजगार कमी झाला आहे आणि महागाईचा पारा भडकला आहे.
- बुलेट ट्रेनचे रूळ टाकल्याने त्यावरून महागाई एक्प्रेस घसरेल व घराघरातून सोन्याचा धूर निघेल अशी फेकाफेक आता राज्यकर्त्यांनी करू नये.
- मोदी लाटेवर शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले अशी थाप मारणाऱ्यांनी तुमचे ओंडके २५-३० वर्षे शिवसेनेच्या लाटेमुळेच तरले हे विसरू नये. प्रश्न इतकाच आहे की, मोदी लाटेचा इतकाच महिमा असेल तर या लाटेने गरीबांचे प्रश्न का सुटत नाहीत व रोज लोकांना बनवाबनवीच्या टोप्या का घालाव्या लागत आहेत?
- सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये. तुमच्या बारशाचे पेढे खाणाऱ्यांपैकी शिवसेना आहे व पेढेवाल्यांचे पैसेही आम्हीच दिले आहेत.
- महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली याचा इतका जळफळाट करून घ्याल तर त्या जळाजळीत तुमचीच राख होईल. त्यापेक्षा महागाई कमी करा.
- अर्थात आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत.