Uddhav Thackeray :  राजरकारणात शत्रूचा शत्रू मित्र असतो अस म्हणतात त्याचीच आज प्रचिती आलीय.....गुजरातमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भाजपकडून पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव केला जात असेल तर शिवसेननं समाजवाद्यांना सोबत घेण्यात गैर काय? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. मुंबईत उद्धव ठाकरेंनी समाजवादी जनता परिवाराशी संवाद साधला आणि ठाकरे-समाजवादी पुन्हा एकदा एकत्र आल्याची घोषणा केली. दुसरीकडेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दस-याआधीच विचारांचं सोनं लुटायला सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना आणि समाजवादी विचारांचे 21 धर्मनिरपेक्ष पक्ष यांची अनोखी युती रविवारी पाहायला मिळाली. अनेक दशकांच्या दुराव्यानंतर वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये उद्धव ठाकरेंनी समाजवादी जनता परिवारातील 21 पक्ष आणि संघटनांशी संवाद साधला... तब्बल दीडशेच्या आसपास समाजवादी विचारवंत आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचा फुले पगडी आणि घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला. एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या बंडामुळं शिवसेनेत दुफळी माजलीय.. मात्र गेल्या काही दिवसांत ठाकरेंनी विविध राजकीय विचारसरणीच्या नेत्यांना आपलंसं करण्याची खेळी खेळलीय.


सगळे एकत्र आले तर भाजपलाही पाडू शकतो


प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी. संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षासोबत शिवसेनेची युती. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद ठाकरेंनी भूषवलं. काही दिवसांपूर्वी यूक्रांदच्या कार्यक्रमाला ठाकरेंनी हजेरी लावली
आणि आता समाजवादी विचारसरणीच्या 21 पक्षांसोबत त्यांनी वैचारिक संवाद साधला. सगळे एकत्र आले तर भाजपलाही पाडू शकतो, असं ठाकरेंनी यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांचा जुना दाखला देऊन सांगितलं. एकंदरीत समाजवाद्यांच्या आडून ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप विरोधाला धार दिली.


शिवसेना-समाजवादी पुन्हा एकत्र 


समाजवादी पक्षांसोबत शिवसेनेनं एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही. 1968 साली शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्षाशी युती करून पहिली निवडणूक लढवली. शिवसेनेचे डॉ. हेमचंद्र गुप्ते पहिले महापौर झाले.  1973 मध्ये शिवसेनेनं रिपब्लिकन गवई गटाशी आघाडी केली.  त्याचवर्षी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन सिंडिकेट काँग्रेसच्या मदतीनं ३२ वर्षांचे सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले. त्यावेळी शिवसेनेला मुस्लीम लीगच्या एका नगरसेवकाचाही पाठिंबा होता.  बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेच्या याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होत आहे.