रत्नागिरी : Shiv Sena : शिवसेनेने ज्येष्ठ नेते रामदास कदम ( Ramdas Kadam), आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील रामदास कदम यांच्या समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दरम्यान, त्याचवेळी शिवसेनेने पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. आता रामदास कदम काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांची उचलबांगडी करण्याचे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री अनिल परब यांच्याबाबतची रामदास कदम यांची वादग्रस्त आँडियो क्लीप चांगलीच भोवली आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी शिवसेनेकडून पालकमंत्री अनिल परब यांच्या मागे ठामपणे असल्याचा संदेश यातून देण्यात आल्याची चर्चा आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्यात. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका बसला आहे.


शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणार्यांना जागा नाही, हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील. या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.


शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या 


- राजू निगुडकर उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी


- किशोर देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा


- ऋषिकेश गुजर, तालुकाप्रमुख, दापोली तालुका


- संतोष गोवले, तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका


- संदीप चव्हाण, शहरप्रमुख, दापोली शहर


- विक्रांत गवळी, उपशहरप्रमुख, दापोली शहर