शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना लिहिलेली मूळ सनद सापडली
श्रीसदगुरुवर्य... सकळतीर्थरुप.... श्रीकैवल्यधाम... श्रीमहाराज.... श्रीस्वामी....स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजी राजे मस्तक ठेऊनी विज्ञापनाजे....
अश्विनी पवार, प्रतिनिधी, झी मिडीया, पुणे : श्रीसदगुरुवर्य... सकळतीर्थरुप.... श्रीकैवल्यधाम... श्रीमहाराज.... श्रीस्वामी....स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजी राजे मस्तक ठेऊनी विज्ञापनाजे.... अशा मायन्यानं सुरु झालेलं छत्रपती शिवाजी महाराजाचं हे पत्र समर्थ रामदास स्वामींना पाठवण्यात आलंय.
१६७८ साली महाराजांनी एक विस्तृत सनद लिहून तब्बल ३३ गावं समर्थांना इनाम म्हणून दिली होती. या सनदेचीच फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनविलेली प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी लंडनमधे आढळली.
या सनदेचं एक छायाचित्र नुकतचं पुण्यात प्रकाशित करण्यात आलं. या पत्रावरचं हस्ताक्षर, महाराजांची राजमुद्रा, स्वाक्ष-या हे सगळं काही आजवर शिवाजी महाराजांच्या सापडलेल्या दस्तावेजांशी मिळतं जुळतं असल्याचं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे.
१९०६ साली देखील या पत्राची एक नक्कल हाती लागली होती. मात्र हे मूळ पत्र कोणाच्याही पाहण्यात आले नव्हते. कौस्तुभ कस्तुरे, शिवराम कार्लेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून या मूळ पत्राची प्रत पुण्यात आणण्यात आलीय.
ही प्रत लवकरच kaustubhkasture.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. समर्थांनी शिवाजीमहाराजांना केलेल्या उपदेशाचाही या पत्रात उल्लेख आहे. या पत्राची प्रत हाती लागल्यामुळे इतिहासातल्या एका कालखंडावर या निमित्ताने प्रकाश पडला आहे.