चंद्रपूर : 'छत्रपती शिवाजी महाराज' हे नावाचं मोठं विलक्षण आणि चमत्कारिक आहे. या नावाच्या नुसत्या उल्लेखाने देखील रोमारोमांत स्फुरण चढते. इथे प्रत्येकजण आपापल्या परीने महाराजांप्रती प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतांना दिसतो. आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराष्ट्रभरात ही जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराजांची जयंतीदिनी कुणी गड-किल्ले सर करतो तर कुणी धुमधडाक्यात साजरी करतो. अशा अनेकानेक वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना आदरांजली दिल्या जाते. पण चंद्रपूर जिल्ह्यातल्या चेक निंबाळा ह्या खेडे गावातील ११ उमद्या तरुणांनी शिवाजी महाराजांना आदरांजली देण्याकरीता 'पायदळ वारी'ची निवड केली आहे. 


'चंद्रपूर ते शिवनेरी' असा तब्बल ६६७ किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केला आहे. 5 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असा 14 दिवसांचा प्रवास करून हे तरूण मंगळवारी रात्री शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचले. चंद्रपुरातील एका दुर्गम भागातून प्रवास सुरु करुन इतका लांब पायदळ प्रवास करणे खरेच सोपे नाही. पण ध्येयापुढे आकाश ही ठेंगण पडतं हेच खरं.


एक छोट्याश्या गावातून निघालेले हे तरुण फक्त आणि फक्त महाराजांबद्दलची आस्था आणि आपणही महाराजांचेच मावळे आहोत ही भावना घेऊन या मोहिमेवर आले आहेत. विदर्भाच्या लोकांना शिवजयंतीचं महत्व पटावं म्हणून पदयात्रा करण्यात आली. ही पदयात्रा करताना काही गावांमध्ये विश्रांती घेण्यात आली. तेथील गावकऱ्यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं असून पुढच्यावर्षी आपण देखील यामध्ये सहभागी होऊ असा विश्वास वर्तवला आहे. 



या तडफदार तरुणांची नावे


अंकुश कौरासे,मंगेश टोंगे,प्रफुल उपरे, देवेंद्र बोबडे,विजय उरकुडे,संदीप उरकुडे,गोपाल नांदेकर, प्रकाश टेकाम,अशोक गोचे ,गजानन वैद्य,अनिल दाखरे अशी तरूणांची नावे आहेत. यातील सर्व तरुण शिक्षित शेतकरी आहेत तर काही व्यवसायिक आहेत. हे मावळे आपल्या गावात खेड्यापाड्यातील तरुणांसाठी कबड्डी सामने व सामाजिक कार्य करून आलेली रक्कम गाव सुधारणेत लावतात. ह्याच समाजसेवेच्या कल्पनेला जोड होती ती शिवप्रेमाची, त्यातूनच शिवाजी महाराजांच्याया दर्शनासाठी पायदळ वारीची अनोखी कल्पना जन्मास आली. 


कसे जायचे,किती अडचणी येतील याची जराही तमा न बाळगता ही मावळे मंडळी निघाली आहे आपल्या राजाच्या दर्शनाला. १५ दिवसांचा हा खडतर प्रवास,म्हणजेच पूर्व महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या कोपर्यापर्यंतचा हा प्रवास विचार करूनही अंगावर काटा आणतो. पण छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेमच आहे जे सर्व काही शक्य करू शकते. शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर त्यांना गडावर पोहोचायचे आहे आणि ही मोहीम त्यांनी १४ दिवसात फत्ते केली.