सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली आहे. सांगली शहरातील विश्रामबाग 100 फुटी रोडवर हे कॅफे शॉप असून आत घुसून तोडफोड करण्यात आली. याशिवाय आणखी दोन कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध पाजून बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लील चाळे करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप आहे. संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं असून, आक्रमक झाले आहेत. 


नितीन चौगुले यांनी यावर म्हटलं आहे की, "गेल्या दीड वर्षांपासून आमच्या संघटनेचं आंदोलन सुरु आहे. आम्ही प्रशासनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिलं होतं. सांगलीसह महाराष्ट्रात असे काही कॉफी शॉप आहेत, जिथे अल्पवयीन मुला, मुलींना प्रवेश दिला जातो. त्यांच्याकडून 200 ते 300 रुपये घेऊन प्रायव्हसी दिली जाते. सगळे अश्लील प्रकार याठिकाणी चालतात. कॅफेशॉपचे मालक या मुलांना ड्रग्ज, गांजाचा पुरवठा करतात".


पुढे ते म्हणाले की, "आज आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या कॉफी शॉपविरोधात कारवाई केली आहे तिथे एप्रिल महिन्यात अल्पवयीन मुलीला गुंगींच औषध देऊन अश्लील चाळे कऱण्यात आले. याचा व्हिडीओ शूट करत नंतर त्याच्या आधारे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तशी फिर्याद तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. याआधी बापट मळ्याजवळील एका कॉपी शॉपमध्येही असाच प्रकार घडला होता. आम्ही वारंवार प्रशासनाला सूचना देत आहोत. पण तरीही सांगलीत असे काही कॉफी शॉप सुरु आहेत".