सांगली : 'कोरोना  (Covid19) हा रोगच नाही. तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे माणसं मरतात ती जगण्यालायक नाहीत' असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले आहे. लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही, असंही संभाजी भिडे म्हणाले. सांगली येथे लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला त्यांनी समर्थन दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दु:शासन होता कामा नये, निवळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनर्त्याना कवडीमोल अक्कल नसल्याचेही ते म्हणाले.



लॉकडाऊनमध्ये खासदार-आमदार यांचे पगार सुरू आहेत. त्यांचे पगार परत घेऊन सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरू आहे. लोकांनी बंड करून उठलं पाहिजे.दारू दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठया मारतात. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते संपूर्ण देशात आहेत. असलं सरकार फेकून दिलं पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले. 


दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. भिडे यांनी करोना रुग्णांची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय. 


सर्वसामान्य लोकांनी मास्क घातला नाही तर कारवाई होते. संभाजी भिडे यांनी मोर्चात मास्क न घालता उपस्थिती लावली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केलीय. भिडे यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.