विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजगडावर जय्यत तयारी सुरू आहे. ६ जून १६७४ या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच दिवसापासून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. तब्बल ३४५ वर्षांपूर्वी याच दिवशी हिंदवी स्वराज्याचं पहिलं यशस्वी पाऊल पडलं होतं. किल्ले रायगडावर शिवरायांच्या राज्यभिषेक झाला आणि याच दिवशी महाराजांनी त्याचं चलनसुद्धा स्वराज्यात लागू केलं होतं... त्याच नाव होतं 'शिवराई'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या आशितोष राहणे पाटील या तरुणानं याच 'शिवराई'चं संकलन केलं आहे. महाराजांनी यावेळी दोन प्रकारची नाणी चलनात आणली होती. त्यापैंकी एक 'शिवराई होन' म्हणजे साडे तीन रुपये, हे सोन्याचं असायचं... त्याचं वजन २.२७ ग्राम असायचं. त्यात ९७.४५ टक्के सोनं आणि बाकी इतर धातू होते. असं म्हटलं जातं की जगभरातील संग्रहकांकडे आता फक्त २२ होन उपलब्ध आहेत.


दुसरा प्रकार होता फक्त 'शिवराई'... शिवराई तांब्याची असायची आणि तिचं वजन १२ ग्रॅम असायचं. शिवराई म्हणजे १ पैसा, त्यात अर्धी शिवराई आणि पाव शिवराईसुद्धा असायची. महत्त्वाचं म्हणजे या काळातील नाण्यांवर उर्दू किंवा फारसी अक्षर असायची मात्र महाराजांच्या नाण्यांवर फक्त देवनागरी लिपी होती. त्यावर 'श्री राजा शिव छत्रपती' असं बिरूद कोरलं असायचं. 


या शिवराईंचा मोठा संग्रह औरंगाबादच्या आशितोष राहणे पाटील या संग्रहकाकडे आहे. या शिवराईचा त्यानं अभ्यास केलाय. त्यातून अनेक निष्कर्षही त्यानं काढले.


इ.स.पू. २ ते ११  आणि १२व्या शतकापर्यंतची अनेक नाणी आशितोषच्या संग्रहात आहेत. औरंगजेबाचा रुपया, शाहाजहानचं चलंन, मुघलकालीन विविध नाणी, यांच्यासह ब्रिटीशकालीन नाण्यांचाही मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. 


शिवराईचा छंद लागलेला आशितोष आता ऐतिहासिक गोष्टीचं संकलण कऱणारा एक अवलीयाच झाला आहे. त्याच्या संग्रहात शिवकालीन हत्यारं, तलवारी, भाले,  इतकंच नाही तर तोफगोळे सुद्दा आहेत. शिवकालीन हस्तलिखीत आशितोषनं जमवलं आहे, तर संत कबीरांचे हस्तलिखीत दोहे सुद्धा त्याच्याकडे आहेत.


भविष्यात यातंच संशोधन करुन करीअर घडवण्याचा त्याचा मानस आहे. १८ वर्षाच्या या अवलियाचे स्वराज्याच्या चलनावर दोन पुस्तकंही प्रकाशित झाले आहेत, हरवलेला इतिहास आशितोष तुमच्या-आमच्या पर्यंत आणण्याचा तो प्रयत्न करतोय.