प्रफुल्‍ल पवार / अलिबाग , रायगड : येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Day) आहे. आणि याच दिवशी किल्ले रायगडावरून ( Fort Raigad)  मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची (Maratha reservation  agitation) घोषणा होणार आहे. त्यासाठी किल्ले रायगडावर येण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. परंतु किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड ग्रामपंचायतीने गावात लॉकडाऊन जाहीर केलाय. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाचाडची ही लॉकडाऊन वादाचा आणि कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल , लॉजिंग व्यवसाय पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शिवभक्तांनी सहकार्य करावे , असे आवाहन पाचाड ग्रामस्थानी केले आहे. शिवाय कोविडचे नियम पाळत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा व्हावा अशी भूमिका ग्रामस्थानी घेतलीय. किल्‍ले रायगडला जाण्‍यासाठी पाचाडहूनच जावे लागते. तेथे येणारे शिवभक्‍त किंवा पर्यटक यांना बाजारपेठ, हॉटेल किंवा राहण्‍यासाठी पाचाड गावातच व्‍यवस्‍था आहे. त्‍यामुळे पाचाड गावात गर्दी होत असते. परंतु सध्‍या गावात कोरोनाचे रुग्‍ण आढळून आल्‍याने ग्रामपंचायतीने जनता संचारबंदी जाहीर केली आहे.



कोरोनामुळे सध्‍या परीस्थिती गंभीर आहे. त्‍यातच आता मराठा आरक्षणाचा मुददा गाजतो आहे आणि त्‍यावर खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. राज्‍य सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी किल्‍ले रायगडवरुन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल, असे संभाजीराजे यांनी म्‍हटले आहे. त्‍यासाठी 6 जून रोजी किल्‍ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक  सोहळयाला उपस्थित, राहा असं आवाहन त्‍यांनी शिवभक्‍तांना केले आहे. यामुळे यंदा किल्‍ले रायगडावर गर्दी होण्‍याची भीती आहे. 


राज्‍यभरातून शिवभक्‍त आल्‍यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो ही भीती ग्रामस्‍थांना आहे. त्‍यामुळे केवळ 25 लोकांच्‍या उपस्थितीतच हा सोहळा साधेपणांन साजरा करावा असं आवाहन पाचाडच्‍या ग्रामस्‍थांनी केले आहे. पाचाड गावात सध्‍या कोरोनाचे 9 रूग्‍ण आहेत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी 6 जूनपर्यंत आम्‍ही जनता कफर्यु जाहीर केला आहे. तेव्‍हां शिवभक्‍तांनी रायगडावर येवू नये आणि आम्‍हाला सहकार्य करावे, असे उपसरपंच बापू घाटगे यांनी सांगितले.