शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज १० मिनिटाकरता तहकूब करावे लागले.
नागपूर: शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्य़ा पुतळ्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या उंची कमी केलेली नसल्याचा दावा केला. विरोधकांनी गोंधळ घालून वेलमध्ये घोषणाबाजी केली. विरोधकांनी जय भवानी-जय शिवाजीची घोषणाबाजी केली. दरम्यान, चर्चेवेळी भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केलेल्या विधानावरही आक्षेप घेत विरोधकांनी त्याच्या निलंबनाची मागणी केली.
विरोधकांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांचा विरोध
मराठवाड्याला वैद्यकीय प्रवेशात सर्वात कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी यांना धारेवर धरले. मराठवाडामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा १९८५ पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र, यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधळ घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी मागणी केली. विरोधकांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.
सत्ताधाऱ्यांची स्टंटबाजी
दरम्यान, विरोधकांच्या मागणीला विरोध करताना सत्ताधारी पक्षाही वेलमध्ये आल्याने आगोदरच सुरू असेल्या गोंधळात अधिक भर पडली. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही वेलमध्ये उतरल्याचे चित्र बघायला मिळाले. महाजन यांच्या वर्तनावर आक्षेप घेत विरोधकही वेलमध्ये उतरले. या गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज १० मिनिटाकरता तहकूब करावे लागले.