Aditya Thackeray on Eknath Shinde: भाजपासोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) येऊन सांगितलं होतं. त्यावेळी ते रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा त्या घटनेचा पुनरुच्चार करत नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावलं होतं. पक्ष सोडणार आहे का? अशी विचारणा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलावलं होतं. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना नेमकी काय गडबड सुरु आहे? मनात काय आहे? बंडखोरी का करायची आहे? पक्ष सोडून जावंसं वाटत आहे का? मुख्यमंत्री व्हायचं आहे का? कसली भीती आहे? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंनीही हे सांगितलं आहे. आता ते रात्री हुडी वैगेरे घालून कोणाला भेटायला जायचे हे काही आम्हाला माहिती नव्हतं. कुरबूर सुरु होती. काही आमदारांनी सांगितलं होतं. तिथे असणारे काही आमदार आजही आम्हाला माहिती देत असतात," असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला आहे.  


"राष्ट्र कोणतंही असलं तरी तेथील स्थानिकांना, लोकांना नोकरी मिळणं गरजेचं आहे. बेरोजगारी, महागाई वाढत चालली आहे. लोकांचे हाल होत आहेत. गारपीट झालेली असून शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही. हे सगळं होत असताना इतर अजेंडा राबवू शकतात, त्यात काही चुकीचं नाही. पण जे लोक मदत मागत आहेत त्यांना मदत होणं गरजेचं आहे. कोणावरही अन्याय होऊ नये हेच आमचं हिंदुत्व आहे. रामराज्य आमचं हिंदुत्व आहे, यांचं रावणराज्य नाही," अशी टीका यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. 


"धनगेकर कोण आहेत विचारणारे नंतर शिवसेना कोण विचारत होते. यापुढे बाळसाहेब कोण असं विचारु शकतात. बाळासाहेबांबद्दल त्यांनी जे विधान केलं आहे, त्याबद्दल देश त्यांना निवडणुकीत धडा शिकवेल. हे ठरवून केलेलं विधान आहे. खडा टाकून किती लोक सहमत असतात, काय प्रतिक्रिया येते हे ते पाहत असावेत," अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन केली. 


"टीयबीएच्या विद्यार्थ्यांना कालपर्यंत परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं नव्हतं. पण मंत्री महोदयांना स्वत:चं प्रमाणपत्र हवं असतं, तेव्हा तीन तासात मिळतं. हे राज्य कुठे चाललं आहे, कोणत्या अंधारात नेऊन सोडत आहेत असा प्रश्न पडला आहे. आम्ही ठाण्यात गेलो तेव्हा इतकी गंभीर स्थिती असतानाही पोलीस आयुक्त हजर नव्हते. जिने तक्रार केली तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. रोशनीताई रुग्णालयात असताना पोलिसांना त्यांना अटक करण्यासाठी पाठवण्यात आलं. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्याला अजून मंत्री ठेवलं आहे. सुषमाताईंना शिवी देणाऱ्यांवरही कारवाई झालेली नाही. किती दिवस गद्दारांसोबत राहायचं आणि राज्याचं वाटोळं करायचं याचा विचार भाजपानेही केला पाहिजे," असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला आहे.