कोल्हापुरात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांना मारहाण केली होती. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून रात्रभर सुरु असलेले कार्यक्रम, पार्ट्या यामुळे होत असलेल्या त्रासाला शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज यांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली असा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याची दखल घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahesh Pandit) यांना झापलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरपे कुटुंबीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी अंबादास दानवे यांनी पोलीस प्रमुखांची खरडपट्टी केली आहे. अंबादास दानवे यांनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन संताप व्यक्त केला. 


दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे यांची तक्रार नोंदवून घेत नसून राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करत नसल्याचं सांगत अंबादास दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करत जाब विचारला. 'एसपी साहेब तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही," असं म्हणत अंबादास दानवे यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दम भरला आहे. 


अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?


"त्यांना मारहाण झाली, त्यांचा फ्लॅट घेतला. तुम्ही काय त्यांना संरक्षण देताय का? मग पुढे कारवाई का झाली नाही? मी आता त्यांना तुमच्या ऑफिसात घेऊन येतो, तुम्ही कुठे आहात? मग एक अधिकारी माझ्याकडे पाठवा, त्यांचा जबाब देतो. कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो. मस्ती चालणार नाही पोलिसांची आणि राजेश क्षीरसागरचीपण, सांगून टाकतो. समजलं का...मी आता त्यांच्या घरी जात आहे तिथे एक जबाबदार अधिकारी पाठवा. तिथे त्यांचा जबाब नोंदवून घ्या. काय करायचं ते करा कलम टाका, नका टाकू पण एफआयआर करा. अन्यथा अधिवेशन सुरु झाल्यावर मी हा मुद्दा उपस्थित करेन," असं अंबादास दानवे फोनवर म्हणाले आहेत.


वरपे यांच्या मुलीने याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरही गाऱ्हाणं मांडलं होतं. मुख्यमंत्री साहेब, तुमचे जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. त्यांना आमचे घरे हवे असल्याने त्यांचा त्रास वाढतच चालला आहे. तुम्ही आम्हाला तुमचं घर विका आणि इथून निघून जा, असंही वारंवार सांगण्यात येत आहे असं तिने व्हिडीओत सांगितलं होतं. 


क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते हे रात्री उशीरापर्यंत त्यांच्या घरातील टेरेसवर पार्टी करत असतात. आवाज कमी करा, असे माझे वडील सांगायला गेले, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसात तक्रार दाखल करायला गेलो, तेव्हा कोणीच आमचं ऐकून घेतलं नाही, कोणीच फिर्याद लिहून घेतली असाही आरोप तिने केला होता.