भाजप खासदार गिरीष बापट यांनी राष्ट्रवादीला म्हटलं `छोटा पक्ष`, तर शिवसेनेला काय म्हटलं पाहा
`भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते`
पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांनाही पुन्हा युती व्हावी, असं वाटत आहे. पुण्यातील भाजपचे खासदार गिरीष बापट यांनीही युती झाल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीष बापट काय बोलले?
प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या भीतीने हे पत्र लिहिल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना गिरीष बापट यांनी म्हटलं की, भाजप हा मदत करणारा पक्ष आहे, कोणतीही कारवाई करत नाही. सरनाईक यांनी भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा गोष्टी होऊ शकतात. आमची युती अनैसर्गिक आघाडीमुळं तुटली होती. भविष्यात युती होऊ शकते. आम्हाला त्याचा आनंद होईल, असे बापट यांनी सांगितले. सरनाईक हे सगळ्यांच्या मनातलं बोलले आहेत. आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद आहे, आता निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे, असं गिरीष बापट यांनी म्हटलं आहे.
पालिका निवडुणकीत युतीला प्राधान्य
राज्यात ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यात मुंबई पुण्यासह दहा महापालिका निवडणुका होणार आहेत. यावर बोलताना गिरीष बापट यांनी पालिका निवडणुकीत भाजपचं शिवसेनेशीच युतीला प्राधान्य राहिल असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही, त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेबरोबरच्या युतीला आमचं प्राधान्य असं गिरीष बापट यांनी म्हटलं आहे.
'सगळी ग्यानबाची मेक आहे'
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावर कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. यावर बोलताना गिरीष बापट यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. दादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण, दादांचं कार्यकर्ते ऐकत नाहीत हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे, असं बापट यांनी म्हटलं.