लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपने कंबर कसली
युतीचं काय होणार याकडे ही लक्ष
विकास भदाणे, जळगाव : सर्वच राजकीय पक्षांना सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. मराठा बहुल असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान भाजप खासदार ए. टी. पाटील यांना हॅट्रिकची अपेक्षा असून त्या अनुषंगाने त्यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या उमेदवारीचा दावा करत गावपातळीवरील मेळावे घेण्यावर भर दिला आहे. शिवसेनेनंही संपर्क अभियान सुरु ठेवलं आहे तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या तंबूत मात्र अद्याप शांतता दिसून येते आहे.
शिवसेना-भाजपची समसमान ताकद
जळगाव लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदार संघापैकी जळगाव ग्रामीण तसंच पाचोरा-भडगाव हे शिवसेनेकडचे दोन विधानसभा मतदार संघ वगळता सहयोगी अमळनेरच्या आमदारांसह तीन मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. तर पारोळा-एरंडोल हा एकमेव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मराठाबहुल मतदार असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेना तसंच भाजपची ताकद समसमान मानली जाते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झालीच तर राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागेसाठी माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे, माजी आमदार मु. ग. पवार यांचे चिरंजीव तसंच राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील हे इच्छुक आहेत. हे तिघं उमेदवार मराठा समाजातील आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात अजून लोकसभेचा निवडणुकीचा गृहपाठ सुरु व्हायचा बाकी आहे.
ए. टी. पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळणार?
विद्यमान भाजप खासदार ए. टी. पाटील यांनी लोकसभा कामगिरीत ८९ गुण प्राप्त केले आहेत. असं असलं तरी मतदारांशी असलेला खासदारांचा संपर्क, केलेली काम हेही उमेदवारी मिळण्याचे निकष असतील. यामुळं भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष असलेले उदय वाघ हे देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीत आहेत. ए टी. पाटलांना पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता असल्यानं ऐनवेळी भाजपकडून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऐनवेळी अन्य पक्षातला मराठा समाजाचा उमेदवार भाजप आयात करू शकते. शिवसेना देखील वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. परंतु शिवसेना भाजपची युतीबाबतीत काय ठरत तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे दोनदा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ए. टी. पाटील यांची लोकसभेत हॅट्रिक होईल का ? याचं भाकीत करण्यासाठी खासदार ए. टी. पाटलांच्या अधिकृत उमेद्वारीची वाट पाहावी लागेल.
भाजपची पकड राहणार का?
गेल्या लोकसभा निवडणुकीत युती असल्यानं भाजप उमेदवाराच्या विजयासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं होतं. मात्र विजयानंतर भाजप सेनेचं राजकीयदृष्टया बिनसलं आहे. शिवसेना यावेळी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. त्याकरिता शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी मतदारसंघात वर्षभरापासून संपर्क अभियान सुरु केलंय. परंतु शिवसेनेची उमेदवारी सर्वस्वी युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडीही अजून अनिश्चित आहे. गेली दहा वर्षे जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपची पकड आहे. भाजपची ही पकड तशीच राहणार की ढिली पडणार हे काळच ठरवेल.