मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनंत चर्तुदशीपर्यंत भाजपा शिवसेनेतील जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांतील चर्चेची पहिला फेरी काल पार पडली. यावेळी मित्रपक्षांना 18 जागा सोडण्याबाबत दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं समोर येत आहे. भाजपाला 160 हून अधिक जागा हव्या आहेत. मात्र यासाठी शिवसेना तयार नाही. तर 110 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास शिवसेना तयार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे जागावाटपाकडे सर्व उमेद्वारांचं लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय पातळवरील सर्वेक्षणात निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 160 जागा मिळतील आणि महायुतील 229 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाला १६० जागा, शिवसेनेला ११० जागा आणि मित्रपक्षांना १८ जागा असाच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम फॉर्म्यूला ठरवण्यासाठी बैठक सत्र सुरू राहणार आहे.



युती होणार ?


भाजपचे सध्या 122 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203, एकूण 288 जागांमधून 203 वजा केले तर उरतात 85 जागा. या 85 जागांचे निम्मे केले तर 42.5 म्हणजेच 43 जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला 122 आणि 43 म्हणजेच 165 आणि शिवसेनेच्या 63 आणि 43 अशा 106  जागा होतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरणार, त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.