युती करायची का नाही? भाजप-शिवसेनेची सोमवारी खलबतं
भाजपाशी युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या सोमवारी मुंबईत शिवसेना खासदारांची बैठक होणार आहे.
जालना : भाजपाशी युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या सोमवारी मुंबईत शिवसेना खासदारांची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे जालना शहरात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या एकदिवसीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, प्रदेश कार्यकारिणीतील १ हजार २०० सदस्य उपस्थित असणार आहेत.
सोमवारी सकाळी १० वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही बैठक चालेल. जालना शहरातील कलश सीड्स कंपनीच्या मैदानावर ही बैठक होणार असून, बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्यांना दिलेल्या विषयाचा आढावा घेताना, या बैठकीत त्यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीनंतर जालना शहरातील मामा चौकात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेची पडद्यामागे चर्चा सुरु आहे. या चर्चेसाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. ही चर्चा नेमक्या कोणत्या मुद्दयांवर होणार याची माहिती झी २४ तासच्या हाती लागली आहे. युती करण्यासाठी शिवसेनेनं भाजपपुढे काही अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्या तरच युती होणार आहे.
केंद्रामध्ये जर पुन्हा सत्ता हवी असेल तर महाराष्ट्र जिंकणे हे भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेसमोर झुकते घेत असल्याचे गेले काही दिवसांपासून दिसत आहे.
लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्मुला ठरवताना विधानसभा जागा वाटपाचा फॉर्मुलाही ठरवावा अशी शिवसेनेची इच्छा आहे. अर्थात भाजप याला तयार होतोय का ? हा प्रश्न आहे. तसेच लोकसभेचे जागावाटप करताना मागच्या लोकसभेत जिंकलेल्या जागा संबंधित पक्षाकडे कायम राहतील आणि हरलेल्या जागांमध्ये फेरफार करता येऊ शकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे.