मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोश्यारी यांचं वक्तव्य समर्थन करण्यासारखं नाही असं स्पष्ट केलं आहे. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावर बोलले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाशी सहमत नाही. मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेलं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मराठी माणसांमुळे मुंबईला वैभव प्राप्त मिळालं. अवमान होवू नये याची काळजी राज्यपालांनी घ्यायला हवी म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना सुनावलं आहे. 


मराठी माणसांच्या बलिदानावरच मुंबई उभी राहिली आहे. मुंबईच्या महत्त्वामुळे हे सर्व आहे. याचं श्रेय इतरांना देता येणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे असं कोश्यारींनी म्हटलंय. मराठी माणसाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं कोश्यारी म्हणाले. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असंही त्यांनी म्हटलं आहे.