सत्तेत आल्यावर लगेचच लोकोपयोगी निर्णय का घेत नाही, शिवसेनेचा भाजपला टोला
भाजपसोबत सत्तेत असूनही त्या पक्षावर टीका करण्याची, हलकाच टोला लगावण्याची एकही संधी शिवसेना कधीही सोडत नाही.
मुंबई - भाजपसोबत सत्तेत असूनही त्या पक्षावर टीका करण्याची, हलकाच टोला लगावण्याची एकही संधी शिवसेना कधीही सोडत नाही. आम्ही सत्तेत असलो, तरी आमची बांधिलकी सामान्य जनतेशी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कायम सांगतात. त्याप्रमाणेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखांमधून भाजपवर कायम टीका केली जाते. यावेळी पुन्हा एकदा भाजपला चिमटा काढण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत महत्त्वाचे निर्णय का घेतले जात नाहीत. निवडणुका जवळ आल्या की घोषणांचा पाऊस का सुरू होतो, असा प्रश्न गुरुवारी अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
निवडणुका जवळ आल्यावर वारेमाप घोषणा करण्याची संधी कुठलाही पक्ष सोडत नाही. मायबाप मतदारराजाला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह कोणत्याही पक्ष मोडू शकत नाही. असे निर्णय घेताना समाजातील सर्व स्तरांतील वर्गांना काही ना काही देऊन चुचकारण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत असतात. तसेच सध्या केंद्रात आणि राज्यातही सुरू आहे. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का, हाच काय तो कळीचा मुद्दा आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महामंडळांना विविध योजना राबवण्यासाठी तब्बल ७३६ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. हा सर्व प्रकार म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी घसघशीत पॅकेजच्या तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या निर्णयांना किंवा घोषणांना कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र निवडणुकांच्या तोंडावर जे निर्णय होतात तेच जर सत्ता मिळाल्यावर झाले असते तर सगळ्य़ा अनुदानांचे वाटप होऊन त्याची उत्तम फळे एव्हाना त्या त्या समाजापर्यंत पोहोचली असती, असाही मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे.