मुंबई : मुंबई ते नागपूर दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या समृद्धी महामार्गाला कुणाचं नाव द्यायचं, यावरून आतापासूनच सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याचं समजतं आहे. तर या नियोजित महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, अशी आग्रही मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी केली आहे.


राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं. त्यामुळं आता या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. सगळीकडे सध्या नावांची चर्चा आहे. देशातील काही शहरांची नावे बदलली जात आहेत. तर काहींची नावे बदलण्याच्या मागण्यांनी जोर धरला आहे. अशातच नावाची आणखी एक चर्चा सुरू झाली आहे.  ती म्हणजे समृद्धी महामार्गाच्या नावाची.