उद्या तुमची पोलखोल करणार, फडणवीसांना `या` मंत्र्याचा इशारा
उद्या अनिल परब पत्रकार परिषद घेणार
मुंबई : फडणवीस तुम्हाला एकट्याला अर्थगणीत कळतं असं समजू नका असा टोला शिवसेना मंत्री अनिल परब यांनी लगावला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले आहेत. त्यांनी फार मोठं मार्गदर्शन केलं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थ गणित कळतं असा त्यांनी समजू नये. सरकारमध्ये बसलेले बरेच लोक अर्थशास्त्र जाणतात हे त्यांनी लक्षात ठेवावं असे देखील परब म्हणाले.
सरकार कसं चालवायचं, सरकार कसं चालतं याची जाणीव महाराष्ट्र सरकारला आहे. त्यांनी वेगवेगळे विषय अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काय समजतंय ते आम्हाला समजतंय.
आमच्या सल्ल्यानुसार ऐकलं तरच सरकार चालू शकेल आणि महाराष्ट्रातील जनता कोरोनामुक्त होईल अन्यथा राज्य फार मोठ्या संकटात सापडेल अशी भूमिका फडणवीस मांडत असल्याचे परब म्हणाले.
महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने, ताकदीने काम करतंय. मुख्यमंत्री अहोरात्र काम करून या संकटावर मात करतायत. त्यांनी जी आकडेवारी दिली त्याची सविस्तर पोलखोल उद्या अतिशय सोप्या भाषेत महाराष्ट्र सरकार जनते समोर मांडणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
उद्या दुपारी १ वाजता नरिमन पॉईंट शिवालय येथे अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते फडणवीसांनी केलेल्या टीकेला कागदोपत्री पुरावे देऊन उत्तर देण्याची शक्यता आहे.